पुस्तकांचा लोभी खपवी डोके
अज्ञानाची भोके बुजविली
लढला अहोरात्र न झोपता
अंधार कोपता प्रकाशाला
ओलांडूनी शतके अचूक जोखणारा
भविष्यात पाहणारा विश्वदूत
झाला महामानव तुमच्या आमच्यातला
देव देवळातला ओशाळला
डोळ्यात घेवूनी आग गात मुक्तीची गाणी
पाजीयले पाणी भल्याभल्यांना
"कोड"ग्या बिलाचे भेदुनि तख्त
महिलांना केले मुक्त जोखडातुनि
होता पिचलेला सारा कामगार
केला हलका भार कायद्यान्वये
झापडे लावून आम्ही अडकविला जातीत
कोंबला पुतळ्यात पुजण्यासाठी
पडण्या पाठीवरी प्रस्थापितांचा हात
स्वकीयांना घालूनी लाथ उभे दारात
सजवूनी बुद्धाला घालती साकडे
कापती कोंबडे सणावारी
खुडले ते बोट "लढा" म्हणणारे
वेगवेगळे नारे प्रत्येकाचेच
मार्ग नुसता सांगणारा नव्हता मार्गदाता
होता मुक्तिदाता बाबासाहेब !
No comments:
Post a Comment