Friday, October 4, 2013

माझ्या छबुकल्या डड्डा

देशात धर्मांध जातीयवाद्यांचा विजय होत असतानाच
तू जन्माला आलास
भयग्रस्त भूतकाळ घेवून
तुझ्यासाठी मी जोपासून ठेवली नाही
रंगीबेरंगी स्वप्नांची बेगडी फुलबाग
आपला असाह्य इतिहासच
कट्याकुट्यातून वाट काढीत आलाय तुझ्यापर्यंत.


डड्डा
तू जन्मलास नि,
आनंदान हुरळून जाण्याएवजी
मी भितीनच गारठून गेलो सर्वार्थान.
फटके फोडून मी साजराही करू शकलो नाही
आनंदोत्सव तुझ्या जन्माचा .
सार शहरच कस हादरून गेलंय बघ
कत्तली, जाळपोळ, बॉम्बस्फोटांनी.
प्रत्येकाच्याच डोळ्यात
अविश्वासाची सळसळती नागीण
नि, दातखिळ बसविणारी दहशत
हातात विनाशाचे सुरे
अन डोळ्यात अविवेकी उद्रेक.
इथ माणूसच माणसाविरुद्ध उठलाय
नपुंसक एस्पितासाठी.
मशिदीतील बांग
नि,
मंदिरातील आरत्यांच्या कोलाहलात
कुणालाच कसा ऐकू येत नाही
तडफडनार्या भुकेचा आवाज ?
तुझे बोबडे बोल ऐकण्यासाठी
मी माझे कान नि काळीज
शाबूत तरी कसे ठेवू?


डड्डा,
हा माझ्या एकट्याचाच नाही
आमच्या समस्त पिढीचाच आक्रोश आहे
रक्तामासाचा चिखल तुडविताना
कुणाच्याच सद्सदविवेक बुद्धीला
फुटत नाही माणुसकीचा पान्हा
आम्ही अजूनही
रक्ताची जात अन धर्म शोधण्यातच मश्गुल आहोत.
आम्हाला आवडत
कुणाच्याही तालावर नाचण
परस्परामध्ये भिंती आखून घेण
दगडामातीच्या देवाधीकांसाठी
हाडामासांच्या माणसांचा कोथळा बाहेर काढण
आधुनिकतेकडून पुराणाकड चाललेला
आमचा हा अधोगतीचा दिशाशून्य प्रवास थोपवून
तू दाखवशील का आम्हाला प्रकाशाचे दार ?

शेवटी इतकंच;
माझी म्हातारपणातली काठी म्हणून
मी पहात नाही तुझ्याकड आशाळभूत
मला फक्त तुझ्यात
पेटवायची आहे संघर्षाची वात
माणसाला माणसात आणण्यासाठी

म्हणूनच -
तू भरभर मोठा हो !
खूप खूप मोठा हो !
माणूस हो !!

Thursday, October 3, 2013

क्षण सुखाचे

तुझ्यातील माणूसपण मी जोखले होते
क्षणही सुखाचे जरा, मी चाखले होते

चेहऱ्यात एका तुझ्या, चेहरे अनेक होते
लुटलो तरीही माझे, इरादे नेक होते

तुला सोसण्याचे, जडलेले छंद होते
मस्तीतले दुख:ही, भलतेच धुंद होते

असणे माझे तुझ्यापरी, नसल्यासवेच होते
भोवती तुझ्या सारे, गुलछबु थवेच होते

तू आखलेले वर्तुळ , तुझ्यापुरते जग होते
डोळे पुसणारे तुझे, काहीजण ठग होते

चुकते मी केले ते, हिशेब चोख होते
काळाचे उत्तरही, त्यावर रोख होते

नावात तुझ्या आयुष्य, सामावले होते
पूर्वजही तेव्हा माझे, दुखावले होते

पेटलेल्या माणसांच्या कोलाहालात



स्वत:चा चेहरा उतरवून ती
माझा चेहरा चाचपडत येते
वाट काढीत काढीत
पेटलेल्या माणसांच्या धुमसणार्या कोलाहालातून
थेट या शहराच्या दुखर्या वस्तीत.

.


तिच वैतागाची नि, माझ्या वेदनेची
घटकद्रव्ये एकच असल्याने
आता,
माझ्याप्रमाणेच तिलाही आलेला आहे
गर्दीचा चेहरा.

.


आम्ही दोघे
हे शहर अन् माझी वस्ती
या दरम्यानची रेषा पुसट करण्याच्या प्रयत्नात.

.


पेटलेल्या माणसांच्या धुमसणाऱ्या कोलाहालात
अजूनही,
तिच्या बांगड्यांची किणकीण एैकली की,
माझ्या डोळ्यांची पाखरं भिरभिरतात
पूर्वीसारखी...

.

फुलांच्या कविता

माझ्या दारावरून नुकतीच
फुलांची वरात निघून गेली
अन् तितक्यात तुझी आठवण आली.
अशावेळी
वाळवंटातही फुलांची रात्र फुलते.

.



नुकतीच कुठं
माझ्या अंगांगावर फुलं फुललीत.
एवढ्यात निरोप घेऊ नकोस !
‘कोमेजणे’ हा फुलांचा गुणधर्म असला तरीही.

.



फुलांच्या प्रदेशात
बेभान भटकणं मला आवडतं
अन्
प्रेतात्रा पाहणंही !

.



तू नेहमीच फुलांच्या गोष्टी करतेस
हे कळाल्यापासून आता
प्रत्येकानं आपापल्या घरासमोर
फुलांचं रोपटं लावलं.....

.

ती
















ती 
कुणी तरी एक चारचौैघींसारखी
मुलगी, बहिण, बायको, आई
या कर्तव्याच्या कचाट्यात जखडलेली.

.



कुणाही नराच्या कामांध नजरेनं
तिच शरीराचा इंच न् इंच भाग
विवस्त्र होत जातो
‘शील’ नावाचं काचेचं भांडं सांभाळता सांभाळता.

.




मूर्तिमंत त्यागाच प्रतीक बनलेली ती
समंजस दु:ख पदराखाली दडवून
वेदनेला पान्हा फुटला तरी
फक्त आतल्याआत खिळखिळी होत जाते.

.



म्हटलं तर,
ती निष्पाप बाळाचं आभाळभर खिदळणं
अन्
पेटून उठल्यावर
रौद्ररूपी राक्षसाचं खिंकाळणं.

.



ती आणून ठेवते
स्वर्गसुखाच मुक्तिद्वारार्पंत
किंवा,
खुलंही करते मरणसुन्न नरकाचं थोबाड.

.



या जालीम दुनिेयेत
ती आजही चारचौघींसारखीच
आभाळाला टिळा लावणच्या प्रयत्नात
माझ्या सोबतीच्या प्रतीक्षेत
मुक्तीलढ्याच्या तयारीत...

.

 

माणसांचं मूल्य

दिवसभर आपण
आभाळाच समान वाटपाबद्दल बोलतो
पण,
संपूर्ण आभाळ कुणी पाहिलं?
म्हणून
या खिडकीतून दिसणारा आभाळाचा चौकोन
आता माझा आहे.

.


बॉसच्या कामांध नजरा टाळून
प्रत्येक रात्री तिच्या स्वप्नात येतो
एक राजकुमार पांढर्याशुभ्र घोड्याच्या रथातून
अन् घेऊन जातो तिला
झोपडीतून आपल्या महालात.

तिने आता कूस बदललेली असावी!

.



कालच असंतोषी मोर्चाबाबत
आपण खूप काही बोललो
‘मोर्चाच्या निषेधाची दिशा आता बदलाला हवी’
असं मी म्हणालो तेंव्हा -
अंधार पेटवाला एक काडीही पुरेशी असते
असंच मला अभिप्रेत होतं.

.



निवडणुका जवळ आलत...

आपल्या देशातील जनता
आपलं राजकीय मत
शिक्के मारून प्रगट करते.

.



मंदिराच्या पाथशी
विखुरलेल्या झोपड्या
माणसाचं मूल्य ढासळात चाललंय ....

.




शहर कसं सुनसान...तणावग्रस्त
दंगल होऊन गेल्यानंतर
कर्फ्यु लावल्यागत्

सूर्योदयाची वाट पहात....

.

अमृताचे नितळ थेंब

मंतरलेली संधकाळ


तुझ्या प्रगल्भ आठवणींसह

.


मालवलेला दिवा
विझून गेलेली स्वप्नं
स्वप्नातलं विरस चांदणं

.

दोन देहांचा प्रकाश
सभोवार काळाकभिन्न अंधार
अन्
तुझ्या किणकिणत्या बांगड्यांच्या आवाजात
धपापणारा जीव 
.

दोन्ही शरिरांची घुसमट
घामाचा कस्तुरी सुवास
दिशा-दिशांमधून लवलवणार्या जिभा
तप्त शिसावर टपटपणारे
अमृताचे नितळ थेंब.
. .


दीर्घ सुस्कारा युगे ओलांडून जाणारा....
 .
.

माझ मत


‘हे जे चाललंय ते
असंच चालायचं
हे चालणार नाही’
असं मी म्हटलेलंही
त्यांना चाललं नाही.
त्यांनी मला देशद्रोही ठरवलं...
चालायचंच !


खरंच,
 खरं बोलणंही आता
‘खरं’ वाटत नाही.
सगळेच क्रांतीची भाषा बोलू लागलेत.
पण ती येईल
हेही तितकंच खरं.


एकमेकांशी संवाद साधणं
अवघड होऊन बसलंय
नाही असं नाही.
तरीही आपण
एकत्र येणारच नाही
असंही नाही.


प्रत्येकाला स्वत:चं मत मांडण्याचा
अधिकार आहे
या मताचा मी आहे.
म्हणून,
माझ मत तुमच्या संसदेविरूध्द !