Monday, September 19, 2016

ग्रहण

ग्रहण
______________________
ती तिचं जगणं जगत असते
मी माझं
अन्
तिसरंच कुणी
आमच्या जगण्यात ढवळाढवळ करीत असते
देवाच्या नावानं,
धर्माच्या नावानं,
संस्कृतीच्या नावानं,
देशाच्या नावानं.
....असं कसं ग्रहण लागलंय सुखाला ?
(C) भगवान निळे

वांझोटे हिरवेपण

वांझोटे हिरवेपण


'आयएसआय मार्क' माणसांच्या या शहरात
प्रत्येकाच्या भावनेला चिकटलाय प्राईज़ टँग
त्यामुळेच 
शहरात बसून
नुसते शब्दांचे मोर्चे काढून
वांझोट्या मनाला येत नाही हिरवेपण
आमची पान्हा चोरलेली गाय
चाटतही नाही पाडसाला मायेनं आता.
आम्हाला दिसतोय
वर्तमानपत्र अन् टीव्हीमधून
तहानलेल्या जमिनीला
पाणवठ्यावर आणण्यात थकून गेलेला शेतकरी
तो मातीत तोंड खुपसून
आभाळाकडे उंचावतोय हात
पोटाला दोन घास देणारे हे हात
मागत नाहीत भीक
त्याची जमीन फक्त एकदा भिजावी सर्वांगानं
मग तो पहा
कसा घाम कालवून नटवील
आपली हिरव्या लुगड्यातली माय.
आम्ही मात्र
सुसंस्कृतपणे पराजय मान्य करण्याचा
दाखवीत नाही मोठेपणा
उलट
पृथ्वीऐवजी मंगळावर शोधतोय पाणी
कॉर्पोरेट तहान भागविण्यासाठी....
~
🍂 भगवान साळुबाई सगाजी निळे

सांत्वनाचा भार

सांत्वनाचा भार
---------------------------------------------
माणूस मरतो तेव्हा
सहानुभूतीला अचानक भरती येते 
अन् सांत्वनाचा भार वाटू लागतो.
श्रध्दांजलीच्या दोन ओळींदरम्यान
मरगळलेल्या साऱ्या आयुष्याची ताटी आवळली जाते
आप्तेष्टही कुंथत कुंथत काढतात वांझ अश्रू
मनातल्या मनात कुणीच रडत नाही
इतका संवेदनाविरहित बनलाय माणूस की
गोड बोलण्यासाठी तीळगूळ द्यावा लागणाऱ्या या जगात
भावूक होणं
तसं कोणत्याच नात्यांत उरलं नाही
सगळीकडेच अस्वस्थ फुलांचा व्याकुळ हुंकार
जगण्याचं चाक जागच्या जागी फिरते आहे
कुणीच घेत नाही प्रकाशाची दीक्षा
व्यक्तिगत दुःख जेंव्हा होते सार्वत्रिक
तेव्हा पाठीवरील एखादाच हात
अश्रूंनी ओला झालेला जाणवतो.
सर्वच पात्रे हळूहळू जाणार आहेत पडद्यामागे
आणि
साऱ्या जगाला सुतक पडले तरीही
कळ्या नव्याने उमलणारच आहेत फुलण्यासाठी
प्रेते सजविण्यासाठी....
~
!! भगवान निळे !!

स्रीत्वाचे अस्तर

स्रीत्वाचे अस्तर
_____________________
आठवड्यापूर्वीच बायको
लख्ख उजेडात मुलीसमोर भांडली होती 
मलाही विशेष काही वाटले नव्हते
काही न वाटणे हेही नेहमीचेच.
काल रात्री देहजाणीव होताच
मी बायकोला खसकन जवळ ओढून घेतले
तर
प्रकाशात अवघडलेपण येते म्हणून
तिने ट्यूबलाईट बंद केली.
भांडण मुलीसमोर अन् प्रेम अंधारात
हे काही कळण्याजोगे नव्हते.
'उजेडात होते पुण्य, अंधारात पाप'
याचा पगडा असावा
किंवा आपले सुटलेले शरीर
नवऱ्याला दिसू नये असे बायकांना वाटत असावे.
अशावेळी
आगतिकतेपोटी तिच्यात आलेली सहनशीलता
भांडताना कुठे जाते हेच कळत नाही
अन् माझ्यातला आदिम पुरुष कुठे लुप्त होतो
हे तिलाही उमजत नसावे.
खरे तर
लैंगिक अस्तित्वाची मादी जवळ आली
तरी
नात्याने बायको असूनही
तिची 'स्री'म्हणून असलेली ओळख पुसली जात नाही
नि तिच्या डोक्यातला माझ्यातील पुरुषही घर सोडत नाही.
संभोगसमयी जांभळ्या काळोखातही
बायकोच्या स्रीत्वाचे अस्तर मात्र टिकून असते.....
~
भगवान निळे

न घेतलेलं चुंबन

न घेतलेलं चुंबन

कित्येक बायकांच्या उबेत
कितीही शाकारून घेतलं मन
तरी तुझं न घेतलेलं चुंबन 
अजूनही पेटत राहिलयं देहभर.
फाकलेल्या पायांमध्ये
सुखाचा अर्थ शोधता शोधता
पुरता देहबंबाळ झालोय मी
माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे असलेले तुझे डोळे
मी अजूनही शोधतोच आहे.
तू अवतीभवती बागडायचीस
अन् ती जागा माझं तीर्थक्षेत्र होऊन जायची.
चार अंगुळे आभाळ
चिमटीत धरण्याची स्वप्नं पहात
तू कोणत्या अवसानघातकीवेळी
पुसट होत गेलीस हेही कळलं नाही.
भानावर आलो तेव्हा
अपराधीपणाची वाळवी लागलेली मेंदूला
नि मरणापर्यंतची हुरहूर जीवाला
मग मी
मनातल्या मनात स्वप्नांची तिरडी आवळली
अन्
मृत्यूचं चुंबन घेण्यासाठी ओठांचा चंबू केला.....
~~
🍂 भगवान निळे

भूक

भूक


तिनं विचारलं,
"तुझ्या प्रेमाची व्याख्या काय?"
मी म्हणालो, 
"प्रेमाची व्याख्या करण्याइतपत
मी अजून बनचुका झालेलो नाही"
मग म्हणाली,
"तू माझ्यावर किती प्रेम करतोस?"
मी म्हटलं,
"भाकरीइतकं"
खरं सांगायचं तर
दोघांनाही सपाटून भूक लागली होती...
~
🍂भगवान नि

आई

आई
___________
आईला नसतो तिचा वेगळा चेहरा
जगभरातल्या आईसारखीच असते आपली आई.
खूप एकटं वाटू लागलं की मी
हार सुकत चाललेला आईचा फोटो पाहतो
आणि
रस्त्यावर येऊन
कोणत्याही अनोळखी म्हातारीशी बोलत बसतो....
~
🍂भगवान निळे

मारेकरी

मारेकरी
________________
जगण्याचा प्रचंड कंटाळा आलेला
आत्महत्या करण्याचेही नव्हते धैर्य
नव्हता उत्साह
मैत्रिणीला म्हटले,
"मला मरण अनुभवायचे आहे
मला मारून टाकण्यास मदत कर "
तर तिने
तिचेच रडगाणे सुरू केले.
मी अजूनही मला मारेकरी शोधतोच आहे.....
~
🍂 भगवान निळे

हिरवेपण

हिरवेपण


जग दिवसेंदिवस अधिकच वाईट बनत चाललंय
हे तू मान्यच केले नाहीस कधी
सर्वकाही आलबेल आहे
आजूबाजूला हसतमुखी लोक आहेत
हे गृहीत धरून तू
शेवटचा दिवस समजून
आलेला दिवस नव्याने जगत राहिलीस
आयताकृती चिप्स झालेल्या आजच्या युगात
कॉपी पेस्ट करून फॉरवर्ड करीत राहिलीस स्वतः ला.
तू कधी पाहिले नाहीस लग्नाकडे
उपजिविकेचे साधन म्हणून
किरकोळ दुःख कुरवाळीत
केला नाहीस नुकसानीचा व्यवहार
विवाहाचा जुगार सगळ्यांनाच जिंकता येतो असे नाही
तुझ्या प्रेमाची जातच होती डोळस
त्यामुळे तुला करावे लागले नाही पावित्र्याचे नाटक
लैंगिक संबंधातील चोरटेपणा झुगारून
तू नात्यात आणू पाहिलास मोकळेपणा
योनीसुचितेशीच निगडीत असलेल्या
नीतिमत्तेच्या कल्पना नाकारल्यास
बाईपण कमरेला खोचून
खडकावर वाढलेल्या एकांगी कोंबासारखी
फुटून बाहेर आलीस
अन् मला शिकवून गेलीस एक सत्य..
_ झाडाचं झाडपण त्याच्या हिरवेपणात असतं !
~
🍂भगवान निळे

'दशा'वतारी कविता

'दशा'वतारी कविता
____________________
स्री
मोहरून येते 
तेंव्हा
मनात
गंध दरवळतो...
मी
छळगंगेत
डुबक्या
मारीत असतो !
2
आंधळा बनून
मी
तिचे
बोलणे ऐकतो.
'प्रौढ शब्द'ही
अभंगासारखे
ऐकू येतात.
3
उत्तर
नको असलेला
प्रश्न विचारला.
अन्
आम्ही
कायमचेच
दुरावलो.....
4
माझं
खालच्या
पातळीवरील
वागणं
नेहमीच
वरच्या दर्जाचं
असतं...
5
मी
तुमच्यासोबत नाही
म्हणून
तुमच्या विरोधात आहे
असं
काही
नसतं !
6
माझ्या
दुःखाचा
एनसायक्लोपीडिया
माझ्या
चेहऱ्यावर
शोधू नका...
चेहरा
फसवतोच !
7
कवीपण
खिशात घेऊन
शहरभर
फिरलो.
कुणीच
हालहवाल
पुसला नाही.
रात्री
भांगेत
चांदण्यांची चिमुट
भरली.
झोप
आवरता
आवरेना....
8
माझ्या
घरात
काहीही
वर्ज्य नाही.
अगदी
सनी लियॉनचे
चित्रपटही.
काल्पनिक
देव सोडून....
9
डोईवरचं आभाळ
दोन्ही हातांनी
चुरगाळून
टाकलं तरीही
आभाळाच्याही वर
कुठे तरी
माझा ईश्वर
असेल
असं
वाटलं होतं.
पण
ईश्वर
माझ्या
आत्म्याच्या पानाला
नेहमीच
चुना लावत
आलेला आहे.
10
शहरात
धार्मिक दंगा
पेटलाय.
मी
दारे, खिडक्या
बंद केल्या.
फेसबुकवर
पोस्ट टाकली.
" खूप झाले,
आता
रस्त्यावर
यायलाच
हवे"
~
🍂 भगवान निळे !!

हल्ली

हल्ली


हल्ली मनासारखं काही घडतच नाही
जाणीवपूर्वक घडवावं लागतं....
झोप न चाळवता
फुलांनी अलगद उमलावे
फुलांच्याच पावलांनी जमिनीवर उतरलेल्या
चांदण्यांनी हलकेच जाग यावी
स्वप्नातही तिच्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू यावा
डोळ्यांच्या खिडक्या उघडल्यावर
चक्क दिसावे भासांचे रंगीत आभाळ
तिने माझ्यावर धरावी तिची सावली
मग आपसूकच माझा जीव झोके घेईल
आडनावासारखं तिला जोडून घेतल्यावर
आशेचा किरण बंद दार पाहून
माघारी परतू नये
असे सारखे वाटत रहाते.
पण......
!! भगवान निळे !!

"दश"दिशा

"दश"दिशा
________________
बायकोला मिठीत घेतले
आणि
तू आठवलीस
मनाचा व्यभिचार
की,
व्यभिचारात अडकलेलं मनं ?
2
बायकोला म्हणालो,
माझ्यानंतर
माझी सर्व पुस्तकं
वाचनालयाला देऊन टाक
तर म्हणते कशी
"माझ्यावर उडालेली तुझी अक्षरं
कशी झटकून टाकू ?
हे तरी एकदा सांग..."
3
मुलाला
अजिबात कविता आवडत नाहीत
रिकामचोटपणाचे धंदे म्हणतो
माझ्या स्मृतीचिन्हावरील धूळ मात्र
तो नियमाने झटकतो.
4
चष्मा पुसला
अन्
नको ते स्वच्छ दिसायला लागले.
कुणीतरी आतल्या आत
माझे डोळे बंद केले.
आता
माझाच मी
मलाच दिसू लागलो....
5
सर्व कपडे काढून
आरशापुढं उभा राहिलो
माझेच लिंग
मलाच गवसेना.
6
आमच्या नव्या कामवालीत
मला माझी बहीणच दिसते
तिला
काढूही शकत नाही
ठेवूही शकत नाही.
7
बहिणीची चीरफाड झाल्यावर
मी शवागारात गेलो
एक मजूर
नग्न पार्थिवाजवळ बसून
काहीतरी खात होता
वडापाव
की
आतडी ?
भुकेला नाव तरी कोणते द्यायचे ?
8
चुलत भावाचे प्रेत समोर
त्याची कललेली मान मी
अलगद



केली.
माणसं प्रेतालाच खूप जपतात !
9
आईची कवटी फुटेपर्यँत
स्मशानातच थांबलो
फुटली
एकदाची
आई माझ्याशी बोलली
शेवटचे.
10
स्मशानातून
घरी परतलो.
घर
आणि
स्मशान
यातलं अंतर
जवळ येत चाललेलं. ....
~
!! भगवान निळे !!

मृृत्युचा चेहरा

मृृत्युचा चेहरा
_____________
मृृत्यू
आपल्यासमोर असतो 
की पाठीमागे ?
तो तर आपल्यासोबतच असतो
आपण जन्मतो
त्याचवेळी झालेला असतो त्याचाही जन्म.
सोबत असूनही
तो दिसत नाही अंधारातल्या सावलीसारखा
सदैव पहात असतो गम्मत
आपण कसे जगतो याची
कधी कधी खूप जवळ येतो
आणि वाकुल्या दाखवून खुदखुदत असतो
कधी खूप दूर असल्यासारखे भासवतो
अन् झडप घालून अज्ञातात नेतो.
आपणही हा खेळ एन्जॉय करत असतो मरेपर्यंत.
आपण झोपेत असतो तेंव्हा
तो जागा असतो
की तोही घेतो एखादी छानशी डुलकी
की भटकून येत असेल गावभर
की देत असेल खडा पहारा चोवीस तास?
मरून झालेल्या कुणी
निदान एकदा तरी येऊन सांगावे
मृृत्युचा चेहरा दिसतो तरी कसा?
निरंकार परमेश्वरासारखा.....
की-
माणसातल्या जनावरासारखा.......
~
🍂 भगवान निळे

!! बायका झाल्यात शहाण्या !!

!! बायका झाल्यात शहाण्या !!


पृथ्वीच्या वाढत्या वयासोबत
पिचलेपण टाकून बायका झाल्यात आता शहाण्या
ब्रम्हांड पुढ्यात मांडून त्या 
पाहू लागल्यात जगाचा चेहरा
त्यांनी आता थांबवलेय स्वप्नांचा उकिरडा उपसणे
आपण जितके झाकू तितके उघडे पडू
याची त्यांना आलीय जाण
यौवनात आल्यावर देण्यात येणारी शिकवणी
असते लिंग झाकून ठेवायचे कापड
हे त्यांना कळून चुकलेय
त्या आता भाळत नाहीत
कुणा पुरुषाच्या चिकनीचोपडी बातांना
त्या विचारू लागल्यात जाब
सहन करण्यावरचा त्यांनी सोडलाय मालकीहक्क
कुणी परपुरुष आलाच स्वप्नात तरी
त्यांना आता वाटत नाही भीती नवऱ्याने संशय घेण्याची
नवऱ्याच्या मैत्रिणींनाही समजून घेण्याचा त्या करताहेत प्रयत्न
बायका कंटाळल्यात घरातल्या घरात करायला सरकारी प्रेम
ज्याचा अर्थ कधी कधी होतो मान्यताप्राप्त बलात्कार
दुनियाभरची ओझी वाहून
बायकांच्या सहनशीलतेची थकलीय पाठ
त्या चघळत बसत नाहीत दुःखाची गोळी
त्यांना कळलंय कसाईधार्जिण्या गाईचं दुःख
आपला हुंदका ऊसवू शकत नाही भिंतींच्या कानाचे पडदे
हे शहाणपण जपायला शिकल्यात बायका
इसापनीतीतील तात्पर्य सांगितल्यासारखं
त्यांना कळू लागलाय जीवनाचा सार
स्वतःसोबत पुरुषही समजून घ्यायला त्या आल्यात पुढे
नाही तरी कसलीही भीडभाड ठेवायची नाही
ही आनुवंशिकता असतेच बायकांमध्ये जन्मजात....
बायका झाल्यात शहाण्या
आता, पृथ्वीचीच काढावी लागेल दृष्ट !
~
भगवान निळे

!! आत्मप्रेमी माणूस !!

!! आत्मप्रेमी माणूस !!

मी अगदी सहजासहजी कुणाच्याही पडतो प्रेमात
कुणी खूप आतून दिला आवाज की
मी अलगद पायऱ्या उतरून पोहचतो तळापर्यंत
मग मला होत जाते माणसांची सवय
सर्वच सवयी नसतात एकजात वाईट
काही सहजासहजी सुटत नाहीत इतकंच !
माझ्या पुढ्यात कुणी सैल केला दुःखाचा बटवा
की नकळत माझ्या डोहात डुचमळू लागते
कुणी केलीच माझ्यापुढं काळोखाची मूठ रिती
अथवा
कुणाच्यातरी चाहुलीचा माझ्यात पेटला दिवा
तर सांडतो माझ्या अवतीभवती उजेड
मग एकमेकांच्या दुःखाची पडते गाठ
खांद्यावर हात टाकून दुःख सांगतात एकमेकांची दुःखं
इथून तिथं दुःख सारखीच असतात....
कोरंकरकरीत माणूस भेटलं की
मी त्याची ठेवतो व्यवस्थित घडी करून कवितेच्या वहीत
काही कागदांची होतात फुलपाखरं
काही रद्दी होऊन कामी येतात.
रद्दीत काढलेली काही माणसं
काळ विसरून कधी कधी येतात वर्तमानात
अन् कायमची घरात घर करून बसतात.
मी खूप जमा केल्यात माणसांच्या आकृत्या
त्यांना दिले नात्यांचे नाव
रक्ताची/ शाईची/ शरीराची / वापरातली / मैत्रीची
एक्स्पायरी डेट असलेली नाती
गेली कधी माती कालवून कधी अत्तर लावून
वेष बदलून आलेली
चिवडत बसलेली
डोळे पुसण्याचे निमित्त करून आलेली
सदैव लांब राहूनही माझ्या हाकेला
"ओ " देण्याची वाट पाहणारी
निरोध समजून वापरणारी
मूर्खपणावर दडून हसणारी
अशी कैक सरमिसळ नाती वागवली आयुष्यभर.
मी संबंधात संपूर्ण नागडं होण्याचं पाळतो पथ्य
मी मांडतो स्वतःला आहे तसा
मी आहे आत्मप्रेमी माणूस
ज्याची तुला एकदा झाली सवय
की तू पार जाशील विस्कटून
नंतर म्हणू नकोस सांगितलं नव्हतं म्हणून...
~

!! रस्त्यावर !!

!! रस्त्यावर !!


ते म्हणाले,
" इज्जतमध्ये रहा"
मी विचारले, 
"म्हणजे कसे ?"
ते म्हणाले,
"टीव्ही पहात घरातच बसायचे"
"फक्त देवळात जाण्यासाठी रस्त्यावर उतरायचे"
" प्रतिप्रश्न करायचा नाही"
" न आवडणाऱ्या गोष्टींकडे बोट करायचे नाही"
"गुमान मतदान करायचे"
"बाई बाळांत झाल्यावर
बाप कोण हे विचारायचे नाही"
मी सर्व नाकारले.
आता
तुम्ही घरात सुखरूप आहात
अन् मी
खरोखरच रस्त्यावर आलोय .....
~
🍂भगवान निळे

!! जन्मभराची कोठडी !!

!! जन्मभराची कोठडी !!

असं का होतं की _
नव्हाळ वयात सर्व काही वाटू लागतं छान छान
सगळ्या प्रश्नांची उत्तरं 
आपल्याच खिशात असल्याचं वाटत राहतं
असंख्य रस्ते आहेत आपल्याजवळ अन्
मनाला वाटेल तो रस्ता अंथरता येतो पावलाखाली
मनाच्या टोकावरून दुसऱ्याच्या मनाच्या टोकापर्यंत
करता येतो प्रवास
एकमेकांच्या पारड्यात टाकता येते अधिकचे माप
मूकपणे मान्य होतात सर्व नियम.
प्रेमाची असोशी अनावर झाल्यावर
करून घेतली जाते कायद्याने सोबत जगण्याची सक्ती.
मग असं का होतं की_
हळूहळू गंजत जातो उत्साह
कोमेजते संबंधातील कोवळेपण
प्राजक्ताची फांदी मान टाकते फुलपाखराच्या खांद्यावर
खळखळून हसण्यावर पडते सुतक
सर्व वाईट विशेषणं वापरली जातात वादात
उखळासारखा वापर केला जातो एकमेकांचा
अन्
घर रहात नाही घर
बनते जन्मभराची कोठडी !
~
🍂 भगवान निळे

!! पृृथ्वी !!

!! पृृथ्वी !!

पृृथ्वीला नसतं विचारायचं तिचं वय
नसतं तोलायचं तिचं वजन
करायचंच असेल तिचं ओझं हलकं
तर आपल्याला व्हावं लागतं फुलपाखरू.
पृृथ्वी असते लहानग्या मुलाच्या हातातील चेंडू
इकडून तिकडे टोलावणारा
असते सूर्याच्या भाळावरील कुंकू
अवकाशातील अनुस्वार
ब्रम्हांडात हरवलेलं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणारं
दगडात उमललेलं एकाकी फुल.
पृृथ्वीचा इतिहास अनादी काळापूर्वीचा
काळाचाच जन्म झालेला असावा पृृथ्वीच्या उदरात
नव्या नव्या जन्मांना जन्म देऊनही
पृृथ्वी होत नाही कधी म्हातारी
सोसण्यासाठी ती उगवतच असते तिच्याच गर्भातून
पुन्हा पुन्हा
आपल्या चेहऱ्यावरील एका पुसट स्मितरेषेसाठी.
_ बाई तरी कुठे वेगळी असते पृृथ्वीहून ....
~
🍂 भगवान निळे

!! आठ तुकडे !!

!! आठ तुकडे !!


मी डोळे मिटतो तर रात्र होते
तिची आठवण येते
अन् माझी पहाट होते.
2
रंगपेटीत चंद्र ठेवून
मुलगी पाहतेय स्वप्न
मी माझी सावली काढून घेतो
झोपेत हसणाऱ्या तिच्या चेहऱ्यावरून.
3
देऊळ लांब डोंगरावर आहे
घराशेजारी आहे बार
थोडी थोडी घ्यायलाच हवी
माझ्या देवांसोबत.
4
ठेच लागून भळभळला अंगठा
जखमेवर चोळण्यास मिळेना माती
या शहरात मी दुरावलोय मातीपासून.
5
पाय घेऊन चाललेत माझ्या डोक्याला
त्यांना हवं तिथं
पाय थकून भागले एका जागी तरी
डोकं चालतच राहिलं अखंड.
6
घरातला आरसा ठेवला पेटीत
रोज रोज स्वतःला पाहून
उडत चाललाय माणसांवरील विश्वास.
7
जगण्याचाच आलेला एकूण वैताग
अन् नेमके त्याचवेळी
लहान मुलाच्या खिदळण्यानं
झाडं सळसळलेली.
8
स्वतःला कोंडून घेतलं तरीही
दरवाजाबाहेर उभे आहेत प्रश्न
उत्तर शोधण्यासाठी
उंबरठा ओलांडावाच लागेल .....
~
भगवान निळे

!! कवीचं घर असतं शेणाचं !!

!! कवीचं घर असतं शेणाचं !!


कवीचं घर नसतं कवीच्या मनासारखं
असतं चारचौघासारखं आखीव रेखीव
टीव्ही, फ्रीज, डायनिंग टेबल, सोफा, खुर्च्या 
एक डबल बेड
अन्
पुस्तकांनी भरलेली कपाटं
जागा भरून उरलेली स्मृतिचिन्हं.
कवीचं घर असतं शेणाचं
कवितेत मात्र असतं मेणाचं.
आत्माक्षरी असते कवीची प्रतिभा
चिल्लर विचारांना झुगारून
कवी उसवत जातो छाती
त्यामुळं त्याच्या घराला येतो चांगुलपणाचा सुगंध
कवी फुलवतो पावसाचं झाड प्रत्येकाच्या मनात
वाटत जातो स्वप्नं
मनगटात भरतो उमेद
शब्दांना चिथावून
तुमच्या पावलांना आणतो रस्त्यावर
तुमची कातडी सोलून ओरबडून काढतो मांस
हाडं खिळखिळी करून पोहचतो काळजापर्यंत
तुमचे डोळे झालेच कधी ओले
तर तो फुलवूही शकतो अश्रूंचे मळे
अनेक पावसाळे मुरल्याने
कवी फेडतो तुम्हाला समृृध्द करण्याचे पांग
शब्दांना खेळवणे असतो त्याच्या इभ्रतीचा प्रश्न.
कवी कवितेत रमतो देहभान विसरून
कारण,
कवीची बायकोही असते चारचौघांसारखीच
शेणाच्या घरावर पंख पसरवणारी....
~
भगवान निळे

!! नवरेपणा !!

!! नवरेपणा !!


मी नाही विचारत तिला
इतका वेळ कुठं होतीस बाहेर?
मी करीतही नाही तिच्या मित्र - मैत्रिणीची चौकशी
चुकूनही चेक करत नाही तिचा मोबाइल
कान लावून ऐकत नाही तिचं संभाषण
कपडे बदलत असताना नाही डोकावत तिच्या आरशात
साडीच्या निऱ्या मात्र देतो चेपून तिला हव्या तेंव्हा
चुकूनही आणत नाही तिच्यासाठी गजरा
कुंकू, टिकली लावून तिनं घालावे मंगळसूत्र
असा धरत नाही हट्ट
बारसं अन् अंत्ययात्रेला जातो आम्ही एकाच उत्साहानं
तिला कधी वाटलीच प्यावीशी बीयर
तर देतो एक ग्लास भरून
सिगारेटीसाठी मागतो तिच्याकडे पैसे
भांडणात आम्ही घालतो एकमेकांना भरपूर शिव्या
मी गळा पकडला तर ती पकडते कॉलर
रात्री मात्र
तिचा हात उशाखाली घेऊनच झोपतो मी.
मी कवी असल्याचे तिला नाही कौतुक
शोकेसमधले मेडल्स मात्र ती ठेवते साफसूप करून.
नवऱ्याबाबत तिच्या आहेत काही व्याख्या
ज्यात मी बसत नाही कुठेच
कुणीतरी गाजवावी आपल्यावर हुकूमत
सिध्द करावा मालकीहक्क
असं सारखं वाटत असतं तिला
अन् मी नसतो माझं कवीपण सोडायला तयार
माझ्या जगातून कुणीतरी आणलंय मला जबरदस्तीनं
या भौतिक जगात असंच वाटत राहतं.
माझी बायको मानतच नाही मला नवरा
अन् मी तिला बायको.......
~
🍂भगवान निळे

!! सापळा !!

!! सापळा !!

तुम्ही पाहिलाय
उंदीर पकडण्याचा पिंजरा ?
मासे पकडण्याचा गळ ?
वाघासाठी झाडाला बांधलेली शेळी ?
नोकरीचं आमिष दाखविलेली बाई ?
नियोजनबध्द सापळ्यात ठेवलेला भुकेचा तुकडा
तुम्ही नक्कीच पाहिला असाल.
सापळ्यात सजवून ठेवलेले असते भुकेला
अन् सावज अडकण्याची असते प्रतीक्षा.
भुकेचं असतं चक्रव्यूह
भुकेला असतात अनेक पाय
भूक खेचून आणते भुकेला
भूक असते भुकेची गरज
भूक खाऊ लागते भुकेला
तुम्ही असता
उंदीर
मासा
शेळी
बाई
किंवा
देवापुढचा नैवद्द....
~
भगवान निळे

!! कुठे आहेत ते ... !!

!! कुठे आहेत ते ... !!


त्या मित्र - मैत्रिणी कुठं आहेत
ज्यांना मी सोडून आलोय तीस - बत्तीस वर्ष मागे
ते असतील का तेथेच जेथे मी सोडले होते 
की निघून गेले असतील तो काळ घेऊन ?
मी विसरत चाललोय काही जणांची नावं
काहींचे चेहरे झालेत धुरकट
काही तर दिवसागणिक पूर्ण अनोळखी.
कुठे असतील ते माझे यार दोस्त
ज्यांचा हात हातात घेऊन
मी व्हायचो मोकळा?
विश्वासानं सांगायचो, विश्वासानंच ऐकायचो ?
ज्यांच्यावर मान टाकून करायचो खांदा ओला
पुसायचो त्यांच्या डोळ्यात तरळलेलं पाणी ?
ज्या मित्राचा वापरला होता शर्ट
त्यांच्या अंगाला अजूनही येत असेल का तोच वास ?
ज्या मित्रानं धोपटलं होतं कुत्र्यासारखं
तो आता येऊन म्हणेल का "सॉरी" ?
डांसबारमध्ये ज्या मुलीला मानले होते बहीण
तिला आजही लॉजवर घेऊन जात असेल का मित्र ?
ज्या मैत्रिणीवर आम्ही मरायचो तिघे-चौघे मिळून
ती आता बनली असेल ना नवऱ्याची शेज ?
कधीच व्यक्त करू शकलो नाही प्रेम
ती मैत्रीण आता देईल का होकार
की म्हणेल, "तेंव्हा का नाही विचारलेस"?
ज्या मैत्रिणीच्या छातीवरून पहिल्यांदा फिरवला हात
ती मला पाहताच शहारेल का त्या दिवसासारखी?
जिच्या कमरेत हात घालून फिरलो शहरभर
जिने सांगितला होता मला मासिकपाळीमुळे होणारा त्रास
ती हसून मिळवेल का माझ्या बायकोशी हात ?
कुठे असतील त्या माझ्या मित्र -मैत्रिणी ?
काही असतील दगावले
काहींनी स्वतःहून केले असेल मृृत्यूला जवळ
काही झाले असतील परागंदा काळाच्या ओघात
काही बनले असतील भ्रमिष्ट स्वतःशी झगडता झगडता
काही फिरत असतील अजूनही रस्त्यावर
काही गेले असतील प्रदेशात नातवंडे सांभाळायला
काही बनले असतील प्राध्यापक, डॉक्टर, वकील
काही झाले असतील जंगलात अंडरग्राउंड
काही व्यसनाधीन, काही दलाल
काही असतील खिळून अंथरुणाला
काहींनी धरली असेल वृृध्दाश्रमाची वाट
काही दंग असतील सत्संगात
काही मैत्रिणी फुगल्या असतील आडव्या तिडव्या
काही बनल्या असतील सीईओ
काही सोफॅस्टीकेटेड कॉलगर्ल्स
काही राबत असतील शेतात, काही घरात
काही पडल्या असतील बाहेर प्रकाश शोधायला.
मी मात्र स्वतःला ढकलत आणलंय येथपर्यंत कसे बसे
माझे बदललेत मित्र बदलत्या दिवसांनुसार
माझे बदललेय कन्फेशन कोर्ट
माझा पालटलाय अवतार
माझ्या दुःखाने बदललेत नवे कपडे
तरी का आठवतात सारखे सारखे जुने ऋणानुबंध?
_ माझी निघण्याची वेळ झालीय का ?
~
© भगवान निळे

!! कुठे आहेत ते ... !!

!! कुठे आहेत ते ... !!


त्या मित्र - मैत्रिणी कुठं आहेत
ज्यांना मी सोडून आलोय तीस - बत्तीस वर्ष मागे
ते असतील का तेथेच जेथे मी सोडले होते 
की निघून गेले असतील तो काळ घेऊन ?
मी विसरत चाललोय काही जणांची नावं
काहींचे चेहरे झालेत धुरकट
काही तर दिवसागणिक पूर्ण अनोळखी.
कुठे असतील ते माझे यार दोस्त
ज्यांचा हात हातात घेऊन
मी व्हायचो मोकळा?
विश्वासानं सांगायचो, विश्वासानंच ऐकायचो ?
ज्यांच्यावर मान टाकून करायचो खांदा ओला
पुसायचो त्यांच्या डोळ्यात तरळलेलं पाणी ?
ज्या मित्राचा वापरला होता शर्ट
त्यांच्या अंगाला अजूनही येत असेल का तोच वास ?
ज्या मित्रानं धोपटलं होतं कुत्र्यासारखं
तो आता येऊन म्हणेल का "सॉरी" ?
डांसबारमध्ये ज्या मुलीला मानले होते बहीण
तिला आजही लॉजवर घेऊन जात असेल का मित्र ?
ज्या मैत्रिणीवर आम्ही मरायचो तिघे-चौघे मिळून
ती आता बनली असेल ना नवऱ्याची शेज ?
कधीच व्यक्त करू शकलो नाही प्रेम
ती मैत्रीण आता देईल का होकार
की म्हणेल, "तेंव्हा का नाही विचारलेस"?
ज्या मैत्रिणीच्या छातीवरून पहिल्यांदा फिरवला हात
ती मला पाहताच शहारेल का त्या दिवसासारखी?
जिच्या कमरेत हात घालून फिरलो शहरभर
जिने सांगितला होता मला मासिकपाळीमुळे होणारा त्रास
ती हसून मिळवेल का माझ्या बायकोशी हात ?
कुठे असतील त्या माझ्या मित्र -मैत्रिणी ?
काही असतील दगावले
काहींनी स्वतःहून केले असेल मृृत्यूला जवळ
काही झाले असतील परागंदा काळाच्या ओघात
काही बनले असतील भ्रमिष्ट स्वतःशी झगडता झगडता
काही फिरत असतील अजूनही रस्त्यावर
काही गेले असतील प्रदेशात नातवंडे सांभाळायला
काही बनले असतील प्राध्यापक, डॉक्टर, वकील
काही झाले असतील जंगलात अंडरग्राउंड
काही व्यसनाधीन, काही दलाल
काही असतील खिळून अंथरुणाला
काहींनी धरली असेल वृृध्दाश्रमाची वाट
काही दंग असतील सत्संगात
काही मैत्रिणी फुगल्या असतील आडव्या तिडव्या
काही बनल्या असतील सीईओ
काही सोफॅस्टीकेटेड कॉलगर्ल्स
काही राबत असतील शेतात, काही घरात
काही पडल्या असतील बाहेर प्रकाश शोधायला.
मी मात्र स्वतःला ढकलत आणलंय येथपर्यंत कसे बसे
माझे बदललेत मित्र बदलत्या दिवसांनुसार
माझे बदललेय कन्फेशन कोर्ट
माझा पालटलाय अवतार
माझ्या दुःखाने बदललेत नवे कपडे
तरी का आठवतात सारखे सारखे जुने ऋणानुबंध?
_ माझी निघण्याची वेळ झालीय का ?
~
© भगवान निळे

!! तसा मी नाही पुरोगामी !!

!! तसा मी नाही पुरोगामी !!


तसा मी नाही पुरोगामी
पुस्तकात असतो तसा
कारण मी नाही कट्टर 
मी नाही एका विशिष्ट कळपात
अथवा टोळीत.
मी कुठेही असतो
जेथे असते आनंदाचे झाड
जेथे मिळतो जीवाला थोडा सकून.
मी गोविंदात नाचतो सैराट होऊन
दहिहंडी फुटताना वाजवतो टाळ्या लहान होऊन
दिवाळीत फोडतो फटाके, वाटतो मिठाई
मुलीला खांद्यावर घेऊन
तिला दाखवतो आकाशातली आतषबाजी
बहिणीकडून बांधून घेतो राखी
रंगपंचमीत होतो इंद्रधनुष्य
गरब्यात पाहतो कलरफूल बायका
त्यांच्या टिपरीच्या तालावर
माझेही पाय धरतात ताल
सजलेले बैल पहायला आवडते मला पोळ्यात
मी होतो नंदीबैल मदमस्त
कवीपण झाकून, पत्रकारितेच्या कार्डावर
रांगेत उभे न राहता
मी पहातो गणेशोत्सवातली सजावट
विसर्जित करतो भोगून झालेल्या दिवसांना
ईदीला मी भिडवतो कुणाच्याही छातीला छाती
हाणतो शिरकुर्मा
"वेलेंटाइन डे " ला पाहतो मैत्रिणीची वाट
कुणी आलीच नाही तर स्वतःच स्वतःला देतो गुलाबाचे फूल
ख्रिसमसला होतो गिफ्ट देऊन स्वप्न वाटणारा साँताक्लोज
सहा डिसेंबरला चैत्यभूमीला जाऊन
शिवाजी पार्कमध्ये होतो पुस्तकांचे मुखपृष्ठ.
मी मानत नाही देव नावाची संकल्पना
मंदिर, मशीद, चर्च, विहारात जाऊनही
मी कधी झुकत नाही कोणत्याच मूर्तीपुढे
मात्र प्रसाद खाण्यासाठी पुढं असतो माझा हात
मला आवडतो अगरबत्तीचा सुवास
कोणत्याही देवाच्या पुढ्यातला.
सण आणि उत्सवात
देव अन् धर्माला वगळून
मी शोधत असतो माणसातला आनंद.
मी वाचत नाही फक्त सुर्वे, ढसाळ
पाडगावकर, ग्रेसही फुलवतात माझ्या सृजनाचे मळे
"श्यामची आई" नि गॉर्कीची "आई "
मी वाचतो एकाच तन्मयतेने
जसे पाहतो
छोटा भीम सिरियल अन् एखादी ब्लू फिल्म
मला नि माझ्या कवितेच्या धर्माला नाही जात.
जेथे जेथे विखरून पडलेले आहेत आनंदाचे कण
जेथे असतो सुखाचा सदरा
तेथे तेथे असतो मी हजर
मी असतो डोळे उघडे ठेवून
दोन्ही हाताने सुख वेचायला.
मला आवडते शेकायला हात अग्निहोत्रात
स्वतःची समिधा न बनता.....
~

!! रात्री अपरात्री !!

!! रात्री अपरात्री !!


मला कधी बरं वाटत नसायचं
मी अस्वस्थ असायचो, गांजलेला
ते न सांगताही आईला नेमकं कळायचं 
बापाला कळायचं की नाही हे माहीत नाही
रात्री अपरात्री आई मात्र अंधारातच
माझ्या पायथ्याशी येऊन बसायची भुतासारखी
अंधारातच फिरवायची केसांतून हात
उगाचच चोळायची छाती, पाठ
ती माझी काळजी करते
याचीच मला वाटायची काळजी
बापालाही कळायची का माझी घालमेल ?
की पुरुषानं दाखवायचं नसतं हळवंपण उघडं करून
असं वाटत असावं त्याला ?
आता;
बायकोजवळून उठून
मीही अंधारात रात्री अपरात्री
जाऊन झोपतो मुलाच्या जवळ
अन् फिरवत बसतो त्याच्या केसांतून,
पाठ अन् छातीवरून हात.
मुलाच्या अंगाखांद्यावरून हात फिरवणं
असतं सुखाचं दुसरं नाव.
आजकाल
मीही रात्री झोपतो
अंधारातून येणाऱ्या बापाच्या हाताची वाट पहात......
~
भगवान निळे

!! घराबाहेर पडलेला भित्रा माणूस !!

!! घराबाहेर पडलेला भित्रा माणूस !!


स्वतःसह मी घराबाहेर पडलो
सर्व अवयव घेऊन.
रस्त्यावर आलो तर
डोळे म्हणाले, "मोर्चा बघ"
मी कानाडोळा केला.
कान म्हणाले, " आक्रोश ऐक "
मी बहिरा झाल्याचे ढोंग केले.
पोट म्हणाले, "माझ्यासाठी लोक उतरलेत"
मी छान ढेकर दिला.
ओठ म्हणाले, "दे घोषणा"
मी त्यांनाच शिवून टाकले.
छाती म्हणाली, " कर मला पुढे"
मी पाठ केली.
हात म्हणाले, " उचल काठी"
मी हाताची घडी घातली.
लाठीहल्ला होताच
पाय म्हणाले, "पळ"
मी "जय श्रीराम" म्हणत पळ काढला.
घरी येऊन पाहतो तर
मेंदू संडासातच विसरून गेलेलो......
~
🍂भगवान निळे

!! अवयवांची कथा !

!! अवयवांची कथा !!

माझ्या दिसणाऱ्या
अन् झाकून ठेवलेल्या अवयवांकडे
पाहू नकोस असा अधाशीपणे 
मला ओरबडून काढण्याची तुझी आदिम इच्छा
चमकतेय तुझ्या डोळ्यांत.
जगातल्या सर्वच बायकांना असतात
सारखीच भोके नेमक्या जागी.
तुला का हवेत माझे निवडक अवयव?
अवयवांसोबत तू स्वीकारशील का
माझ्या डोक्यातील उवा?
कपाळावरील घाम?
डोळ्यांतील घाण?
नाकातील शेंबुड?
गळ्यातील बेटका?
बेंबीतील मळ?
जांघेतील पुळ्या ?
पायातील कुरूप?
की
तुला फक्त हवेत
ओठांच्या पाकळ्या ?
स्तनातील ताठरता ?
योनीचे स्वर्गीय प्रवेशद्वार?
एकदाचे सांगून टाक _
मासिकपाळीच्यावेळी तू
टेकवशील का कविता म्हणणारे तुझे ओठ
माझ्या सृजनशीलतेवर?
की,
"शी " म्हणून मुडपशील नाक ?
स्तन लुचताना
पिशील का दूध बाळ न बनता ?
की,
त्यावेळीही सळसळेल तुझे वीर्य ?
_ माझ्या अवयवांची कथा
कोणत्या पानावर थांबणार आहे ?
~
🍂 भगवान निळे

!! आई - बाबा !!

!! आई - बाबा !!


तुमच्यासाठी खूप काही करायचे होते
तेंव्हा करू शकलो नाही
आता करण्याची क्षमता आहे तर 
तुम्हीच नाहीत.
तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले
ज्यांच्यासाठी करायचे होते
त्यांच्यासाठी तुम्हालाही करता आलं नसेल
माझ्याचसारखे.
हे मला समजू लागले आहे.
मी घेतोय तो श्वास तुम्ही दिलेला आहात
तुम्ही आणखी काही काळ
तुमचा श्वास धरून ठेवला असतात
तर तुम्हाला फुललेली फुले पाहता
नि लगडलेली फळे चाखता आली असती.
_ नेमकी सुखाच्याच क्षणी तुमची आठवण येते.
~
🍂 भगवान निळे

!! मायानगरमधील अश्रफचे घर !!

!! मायानगरमधील अश्रफचे घर !!


मी वाढलो ज्या मायानगर झोपडपट्टीत
तिथं होता आमचा मुसलमानांचा शेजार
समदुःखी असल्यानं
पटत असावं त्यांचं "जयभीमवाल्यां"शी
बांधून ठेवलं असेल आम्हाला
असुरक्षिततेच्या धाग्यांंनी एकमेकांना
अथवा
असावी दुःखाची एकच नाळ.
फजरची अजान होताच
मोहल्ल्याला यायची जाग
अब्बाजान पढायचे फातिहा
अम्मीजान बसायची तसबीह जपत
अन् अश्रफ यायचा गोट्या खेळण्यासाठी माझी झोपमोड करायला
मुमताजदीदी पळायची नळावर नंबर लावायला.
अश्रफने कधी हातात धरले असावे कुराण
हे आठवून नाही आठवत
माझ्यासोबत तो यायचा विहारात
अन् मी जायचो मशिदीत गंमत म्हणून
त्याच्या खतन्याबाबत
मला नेहमीच असायचे कुतुहल नि भीती
मुमताजदीदी बाहेर जातानाच दिसायची नकाबमध्ये
ऐरव्ही तिचा लिबाज असायचा माझ्या बहिणीसारखाच.
पाचवेळचा नमाज पढायला
त्यांच्याकडे नव्हता वेळ
हातावर पोट घेऊन ते करायचे किडुक मिडुक कामे
बकरी ईदलाच मी खायचो त्यांच्याकडे ईदी
"मोठ्याचे मटण" मलाच उठायचे खायला.
त्यांनाही आवडायचे आमचे बोंबिल आणि बरबाट.
अब्बाजानने केली होती एकच शादी
मुलंही होती चारच
ते अल्लाहला झाले प्यारे
तेंव्हा मी दिला होता त्यांच्या जनाजाला खांदा
कब्रस्तानात कबर खोदून झाल्यावर
लावले लाकडी बरगे. नि
मयतीवर मूठभर माती टाकून
हॉटेलात खाल्ली भुर्जी अश्रफसोबत.
ज्या ज्यावेळी व्हायचा हिंदू - मुस्लिम दंगा
आमची झोपडी व्हायची त्यांच्यासाठी मशीद
अन्
त्यांच्या झोपडीतून बाहेर पडताना
मला वाटायचे हज करून आल्यासारखे.
_ अल्लाहचा चेहरा बुध्दासारखा तर नसेल ना ?
~
🍂 भगवान निळे
!! जिंदगी के सफर मैं !!


"फॅन " नावाची गोष्ट प्रचलित नव्हती
तेंव्हा तो होता राजेश खन्नाचा जबरदस्त चाहता.
"जिंदगी एक सफर हैं सुहाना " 
हे गाणं होतं त्याच्या तोंडावर.
तो
घरंदाज घर
सरकारी नोकरी
एकदा तरी मागं वळून पहावं असं रूप
त्यात नको तितका सुसंस्कृत.
बऱ्याच मुली मरायच्या त्याच्यावर
पण त्यानं कधी कुणाकडं पाहिलं नाही वाकड्या नजरेनं
लग्नाला आलेला तरीही होता सडाच
तसा तो मिसळायचा नाही कुणात फार
"आपण भलं, आपलं काम भलं " कॅटेगरीतला
नाही तरी चार दोन होते त्याचे दोस्त
नाही असे नाही
त्यातल्या त्यात कुणी एक लग्न झालेला
होता त्याचा जिगरी यार
त्यांचे जोडाक्षर दिसायचे नेहमी
त्यांची यारी झाली होती तेंव्हा मिसाल.
मग कानांना ओठ लागून
त्यांची जवळीक झाली दबक्या आवाजातला विषय
वस्तीत बोभाटा होताच
त्याच्या आयुष्याची विस्कटली घडी
दुरावलं घर
गेली नोकरी
तुटले नातलग
त्याचा प्रियकरही झाला परागंदा बायको-पोरासह
राजेश खन्ना पुसट होत गेला पडद्यावरून.
त्याने केले दारूला जवळ
घेतला आसरा फुटपाथचा
येणाऱ्या जाणाऱ्याकडून मागू लागला भीक
स्वीकारलाही गेला नाही तृतीय पंथियांच्या गोतावळ्यात
भिकाऱ्याच्या अवतारामुळे
"रोटी" चित्रपटाच्या पोस्टरचं छत असलेल्या
फुटपाथवरील छपरात गेला मरून.
त्यावेळी पृृथ्वीवर कुठं तरी
नक्कीच वाजलं असेल गाणं
"जिंदगी के सफर में गुजर जाते हैं ..."
~
🌹भगवान निळे
!! भारल्या गेल्या एका भल्या दुपारी !!*
वयाची दरी पार करून तू
फुलपाखरू होऊन भिरभिरतेस अवतीभवती
अन् माझ्यातलं निष्पर्ण झाड येतं बहरून.
"सर, तुम्ही मला खूप आवडता?"
या तुझ्या एकाच वाक्यानं
मला चक्क हवाही दिसू लागते
नि, मी तरंगू लागतो
उललेल्या बोंडातून कापसासारखा.
भारल्या गेल्या एका भल्या दुपारी
तू मला घरी बोलावतेस
घरी कुणीच नसते तुझ्याशिवाय
तू बेडरूममध्ये जाऊन कपडे बदलून येतेस
मी चाळत असतो कवितासंग्रह
जुजबी संभाषणानंतर तू पुन्हा बेडरूममध्ये जातेस
कपडे बदलून पुन्हा सामोरी येतेस
माझ्या डोळ्यांत पहात डोळ्यांतूनच हसतेस
माझे शब्दहीन ओठ मिटले जातात
एकडचे तिकडचे बोलून तू पुन्हा जातेस
अन् कपडे बदलून समोर उभी राहतेस
डोळ्यांनी बोलतेस
मला डोळ्यांची भाषा उमजत नाही.
माझ्या मनात सुरू असतो बाहुल्यांचा खेळ.
हा कसला जीवघेणा खेळ तू खेळतेस ?
माझ्यातला अंधार जळत जातो
उडून जातं माझ्या सज्जनतेचं वर्ख
लख्ख उजेडात मी गोळा करतो
माझा चेपलेला धीर
आंधळेपणाने मी येतो तुझ्यापर्यंत स्वतःला ओलांडून
तर तुझी अबोल पावलं थबकतात एका जागी
मी तुला मिठीत घेऊ पाहतो
तू मला प्राणपणाने दूर ढकलतेस
अन्
मुसमुसून रडू लागतेस.
मला लावता येत नाही कशाचा कशाला अर्थ
मी स्तब्ध. पुरता गोठून गेलेलो.
खरं तर -
तुला वाटत असावं
मी करावी तुझी स्तुती
आदरार्थी डोळ्यांनी पहावं तुझ्याकडे
सांगावं तू कशी दिसतेस ते
तुझ्या पाठीवरून फिरवावा मायेनं हात
कवेत घेऊन तुला अनुभवी द्यावी सुरक्षिततेची ऊब
करावा तुझ्यासह तुझ्या शरीराचा आदर.
तुला हेही वाटत असावं की,
मी पुसाव्यात माझ्या पुरुष असल्याच्या सर्व खुणा
अन्
जोजवत बसावं तुला कवितेच्या ओळींसारखं......
~
(c ) भगवान निळे